महत्त्वाच्या बातम्या

संत तुकाराम महाराज यांच्या भक्तीपरंपरेचा ठसा लोहगाव परिसरात आजही जिवंत

“भक्ती विना सुख नाही 

तुका म्हणे सत्य हेचि “

 अभंग म्हटला की तो तुकारामाचाच अशी आपल्या साहित्यामुळे लोकप्रियता मिळवलेल्या तुकारामांचा जन्म इसवी सन 16 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई होते. सावकारी करणारे हे कुटुंब विठ्ठलाची मनापासून भक्ती देखील करत. तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार करताना समाजातील सर्व लोकांना समान मानले. जातीभेद, अन्याय आणि अहंकार यांना त्यांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांनी हजारो अभंगाची रचना केली. त्यांच्या अभंगातून भक्ती बरोबरच नैतिकता, प्रामाणिकता आणि समाजातील एकता यांचा संदेश दिला आहे.

 

 लोहगाव आणि संत तुकाराम महाराज भक्ती परंपरेची जपणूक

 पुण्यातील लोहगाव हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आजोळ आहे. त्यामुळे बालपणी व त्यानंतर ही त्यांचे तेथे येणे जाणे होते. तुकाराम महाराजांनी या परिसरात वेळ घालवला आहे. तुकारामांचा आणि लोहगावचा संबंध महीपती बाबांनी सुद्धा भक्ती विजय ग्रंथात वर्णन केला आहे. तुकोबा लोहगावला गेल्यावर ज्या शिळेवरती बसून स्नान करीत त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मंदिर बांधलेले आहे. आज ही लोहगाव मध्ये हे शिळा मंदिर पहावयास मिळते. लोहगावात दरवर्षी मोठ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंपरेनुसार तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात अनेक गावांमध्ये थांबत असत त्या ठिकाणी ते विठ्ठल भक्तीचा प्रसार करत. लोहगाव मध्येही त्यांनी कीर्तन आणि अभंग गाऊन लोकांना साधेपणा, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराज आणि लोहगाव यांचा संबंध हा भक्ती परंपरा आणि समाज जागृतीशी जोडलेला आहे. संतांच्या विचारामुळे या परिसरात भक्तीची परंपरा जिवंत राहिली आहे आणि आजही अनेक भाविक त्या परंपरेचे जतन करत आहेत. लोहगाव मध्ये आजही तुकाराम महाराजांच्या स्मृती जपल्या जातात वारकरी आणि भाविक येथे येऊन अभंग गायन करतात आणि संतांच्या विचारांची आठवण ठेवतात. त्यामुळे लोहगाव हे गाव वारकरी परंपरेच्या दृष्टीने एक पवित्र स्थान मानले जाते.

 “जे का रंजले गांजले

 त्यासी म्हणी जो आपुले 

तोचि साधू ओळखावा 

देव तेथेची जाणवा”

 या अभंगातून त्यांनी मानवतेचे आणि परोपकाराचे महत्त्व स्पष्ट केले आहे आजही लोहगाव परिसरातील वारकरी आणि भक्त या विचारांचे पालन करताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!