महत्त्वाच्या बातम्या

अतीमुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर

पुणे: बंगालच्या उपसागरात आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात राज्यातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असताना, आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील एकूण २३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असून, नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्यातही गेल्या २४ तासांत पावसाने दमदार बॅटिंग केली असून, कुरवंडे येथे सर्वाधिक ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय गिरीवन, भोर, पाषाण, एनडीए, चिंचवड आणि शिवाजीनगर परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत हा पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारपासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे. सखल भागांत पाणी साचल्यामुळे आणि पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि पूरप्रवण क्षेत्रातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!