महत्त्वाच्या बातम्या

“उपोषण सुटले, पण लढा संपलेला नाही!” सोनम वांगचुक यांच्या उपोषण समाप्तीवर संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी तब्बल २६ दिवसांनंतर समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता यावरून राजकीय वाद पेटला आहे. उपोषण सोडवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी देशभरातील शिक्षण व्यवस्थेच्याविरोधात पेटलेले हे आंदोलन आता सहजासहजी थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी उपोषण सोडवण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला. “सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर सर्व आंदोलक, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासारख्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उपोषण सोडले असते, तर देशाला आणि विद्यार्थ्यांना अधिक समाधान वाटले असते. परंतु, सरकारने केवळ श्रेय लाटण्याच्या घाईत आंदोलनाच्या मुख्य प्रतिनिधींना डावलून मध्यरात्री हे उपोषण मागे घ्यायला लावले,” असा थेट आरोप त्यांनी केला. मुख्य मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे काय झाले? असा सवाल करत सरकारने नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले.

देशभरात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून या आंदोलनातून एका मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात झाली असल्याचे राऊत म्हणाले. या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातही याविरोधात मोठा लढा उभारला जात आहे. मुंबईत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगान आंदोलन आयोजित करण्यात आले असून, येत्या २६ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. संसदेत या गंभीर विषयावर चर्चा टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तरी विद्यार्थ्यांचा हा लढा आता थांबणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!