सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान मतदान जनजागृती चवणेश्वर येथे स्विप अंतर्गत उपक्रम; शंभर टक्के मतदानाचा निर्धार
मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करुन लाेकशाही अधिक बळकट करावी यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघात स्विप अंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान मतदान जनजागृतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी संजय शेरे, महेंद्र शेरे यांनी पुढाकार घेतला. शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त करत तशी प्रतिज्ञा घेतली.
लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी स्विप उपक्रमांतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघात प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्विपचे नोडल अधिकारी सचिन जाधव व त्यांचे सहकारी गावोगावी फिरुन मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या उपक्रमांतर्गत चवणेश्वर येथे मतदान जनजागृती कार्यकम घेण्यात आला. यावेळी मोठया संख्येने मतदार उपस्थित होते. लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार वापरणे गरजेचे असून बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन यावेळी सचिन जाधव यांनी केले.
विशेष म्हणजे चवणेश्वर येथील निवृत्त नेव्ही ऑफिसर संजय शेरे, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शेरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुरु असताना त्या दोघांनीही स्विप उपक्रमात सहभाग नोंदवून प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन केले. यावेळी “मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा”, “आपले मत आपले भविष्य” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, संकल्प आमचा शंभर टक्के मतदानाचा या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मतदारांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात उपसरपंच संतोष पवार, माजी सरपंच दयानंद शेरे, जितेंद्र जगताप, सदाशिव जगताप, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कांबळे, रमेश पवार, हरीदास शेरे, युवराज शेरे, संतोष शेरे, सतीश सुर्यवंशी, उध्दव पवार, हणमंत सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, सौ. माधुरी शेरे, परमेश्वर पवार, सचिन पवार आदी सहभागी झाले होते.
