महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या दावणीला हात घालणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद; भुईंज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

आनेवाडी (विशेष प्रतिनिधी):

वाई तालुक्यातील विविध ग्रामीण भागांतून शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दुभती जनावरे लांबवणाऱ्या सराईत ‘पिकअप गँग’चा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून कवठे, ओझर्डे, खडकी आणि कुडाळ परिसरातून चोरीला गेलेल्या एकूण सहा जनावरांचा उलगडा झाला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेंदूर सणाच्या दिवशीच पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

गेल्या १९ व २० जूनच्या मध्यरात्री मौजे कवठे (ता. वाई) येथील शेतकरी किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन महागड्या मुर्रा म्हशी अज्ञात चोरांनी पळवून नेल्या होत्या. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अशी झाली कारवाई

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या या चोऱ्यांचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयितांचा माग काढला. संशयित आरोपी पिकअप गाडीतून पाचवडच्या दिशेने येत असल्याची गुप्त बातमी मिळताच पोलिसांनी पाचवड चौकात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१. सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड, ता. वाई)

२. संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी, ता. वाई)

३. हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगाव, ता. वाई)

परजिल्ह्यातील बाजारात विक्री

पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी कवठे येथील २ म्हशी, ओझर्डे येथील १ म्हैस, खडकी येथील १ जर्सी गाय आणि कुडाळ येथील २ म्हशी अशा एकूण ६ जनावरांच्या चोरीची कबुली दिली. ही जनावरे त्यांनी चाकण (पुणे), काष्टी-श्रीगोंदा (अहिल्यानगर) आणि सांगोला (सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात नेऊन विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विकलेली जनावरे परत मिळवण्यासाठी पोलिसांचे पथक संबंधित व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.

ही यशस्वी कारवाई भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे, पीएसआय सुरेश शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, धायगुडे तसेच कर्मचारी सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते व किरण निंबाळकर यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!