महत्त्वाच्या बातम्या

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा प्रवास ४५ मिनिटांत; उद्घाटनाची प्रतीक्षा

पुणे: पुणेकरांची रोजच्या बिकट वाहतूक कोंडीतून मोठी सुटका करण्यासाठी सज्ज झालेली हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) आता तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून प्रतीक्षा वाढली आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाअभावी प्रवाशांच्या सेवेपासून वंचित राहिल्याने पुणेकरांमधून उत्सुकतेसह नाराजीही व्यक्त होत आहे.

     माण ते आर.के. लक्ष्मण म्युझियम आणि पुढे जिल्हा न्यायालयापर्यंत (डिस्टिक कोर्ट) विस्तारणाऱ्या या मेट्रो मार्गावर एकूण १२ अत्याधुनिक स्थानके उभारण्यात आली आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा तब्बल दीड तासाचा वेळ आता थेट ४५ मिनिटांवर येणार आहे. यामुळे चाकर मान्यांचा मौल्यवान वेळ तर वाचेलच, शिवाय रस्त्यावरील ट्रॅफिक, प्रदूषण आणि धुळीच्या त्रासापासूनही मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर यांसारखे गर्दीचे आणि महत्त्वाचे परिसर या प्रकल्पाद्वारे थेट जोडले जाणार आहेत.

     पुणे मेट्रो लाईन-३ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग देशातील मोजक्या शहरांमध्ये असलेल्या डीसी ७५० व्होल्ट थर्ड रेल इलेक्ट्रीफिकेशन सिस्टीम (DC 750V Third Rail System) वर धावणार आहे. पुण्यामध्ये पहिल्यांदाच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पारंपारिक ओव्हरहेड वायर (OHE) किंवा मास्टवर अवलंबून न राहता थेट रुळांमधूनच मेट्रोला वीज पुरवठा केला जातो.

       कोलकाता आणि बंगळुरू (नम्मा मेट्रो) नंतर आता पुण्यात हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या आणण्यात आले आहे. या नव्या पद्धतीमुळे ओव्हरहेड वायर उभारण्याचा आणि त्याच्या देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे, तसेच पॉवर फेल होण्याचा धोकाही पूर्णपणे टळतो. याशिवाय, कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) या प्रगत डिजिटल सिग्नलिंग तंत्रज्ञानामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार असून प्रवाशांना ट्रेनसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. सर्वार्थाने परिपूर्ण आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेला हा प्रकल्प आता केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, लवकरच हा मार्ग पुणेकरांच्या सेवेला रुजू होईल अशी तीव्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!