महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात दुचाकी चोरीचा छडा; १ लाख ३५ हजारांच्या दोन मोटारसायकल जप्त

सातारा : सातारा शहरातील शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.

      शाहुपूरी पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक तयार केले.

   तपासा दरम्यान पोलिसांनी चोरीच्या घटनेच्या ठिकाणासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचवेळी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार चोरीतील संशयित आरोपी सातारा शहरातील राजवाडा परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विठोबाचा नळ परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटार सायकल हस्तगत केल्या.

       या प्रकरणी सुरज अनिल भोसले (वय ३२, रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दोन दुचाकींची एकूण किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप मदने करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

       शहरातील वाहन चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करून चोरीच्या वाहनांची जप्ती आणि आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. या कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!