महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांची तयारी; डीजे साऊंड सिस्टीमची डेसिबल चाचणी

पुणे: दहीहंडी आणि आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ऐरणीवर येणाऱ्या डीजे (DJ) आणि साऊंड सिस्टीमच्या आवाजाच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा एक अभिनव व तांत्रिक मार्ग अवलंबला आहे. ध्वनी प्रदूषण आणि कायदेशीर मर्यादांचे पालन करून उत्सव कसा साजरा करता येईल, यासाठी थेट पोलीस आयुक्तालयात विविध साऊंड सिस्टीमची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत डेसिबल मोजणी करत साऊंडच्या तीव्रतेचा सखोल तांत्रिक अभ्यास करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहर वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

         गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरात सार्वजनिक मंडळे आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीममुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास तसेच पर्यावरणप्रेमींच्या तक्रारी लक्षात घेता पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यस्थी करत थेट आयुक्तालयात साऊंड व्यावसायिकांना बोलावून त्यांच्या उपकरणांची प्रत्यक्ष खातरजमा केली. या उच्चस्तरीय चाचणीवेळी पोलीस आयुक्तांसह सहपोलीस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच ‘पुणे साऊंड असोसिएशन’चे अध्यक्ष बबलू रमजानी आणि त्यांचे इतर पदाधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले होते.

      विशेष डेसिबल मॉनिटर मशीनच्या साहाय्याने वेगवेगळ्या साऊंड कॉम्बिनेशनची आवाजाची पातळी किती वाढते, याची वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ‘२ बेस – २ टॉप’ आणि ‘४ बेस – ४ टॉप’ अशा विविध सेटअपमुळे निर्माण होणाऱ्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली. तसेच काही स्पीकर बॉक्समध्ये अनधिकृतपणे आणि मूळ क्षमतेपेक्षा कैक पटीने आवाज वाढवण्यासाठी बसवले जाणारे ‘प्रेशर मिड’ (Pressure Mid) हे उपकरण कसे काम करते आणि त्यामुळे आवाजात किती घातक वाढ होते, याचीही सविस्तर माहिती पोलिसांनी घेतली.

       या तांत्रिक चाचणीवर प्रतिक्रिया देताना पुणे साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी, वाढत्या आणि कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, नेमक्या कोणत्या उपकरणांमुळे हा त्रास वाढतो, हे स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः ‘प्रेशर मिड’ या उपकरणाला आमच्या संघटनेचा तीव्र विरोध असून, यामुळे मूळ क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त व त्रासदायक आवाज तयार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कायद्याच्या चौकटीत आणि निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेतच उत्सव साजरा केला पाहिजे, अशी भूमिका साउंड व्यावसायिकांनी यावेळी मांडली.

         पर्यावरण कायदा आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या ट्रायलच्या माध्यमातून पोलिसांनी साऊंड सिस्टीमचे प्रकार आणि कस्टमायझेशनचा बारकाईने अभ्यास केला आहे. आता या तांत्रिक चाचणीच्या निष्कर्षांच्या आधारे पुणे पोलीस आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी नेमकी काय अंतिम नियमावली जाहीर करतात, याकडे संपूर्ण शहरवासीयांसह गणेश मंडळे आणि साऊंड व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!