राहुल गांधींच्या दौऱ्याआधी पुण्यात कडेकोट बंदोबस्त
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या काही तास आधी सीओईपी (COEP) वसतिगृहाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि एनएसयूआय (युवक काँग्रेस)चे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही काळ तीव्र तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल ५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि ७०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरात आरटीओ जवळील एआयएसएसएमएस (AISSMS) शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर आज सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमा साठी तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कार्यक्रमाचे प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच कार्यक्रमाला येणाऱ्या वाहनांच्या तपासणीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडींना वेग आला असून सीओईपी वसतिगृहात मोठा वाद पाहायला मिळाला. एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृहात येऊन विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करत असून धमकावत असल्याचा गंभीर आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. तर दुसरीकडे, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात येऊन विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत दमदाटी केल्याचा प्रतिआरोप युवक काँग्रेसने केला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना दूर सारले आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.
दुसरीकडे, युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याच्या आणि राष्ट्राभिमानाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील परिसरात सायंकाळी ५ वाजता संपूर्ण वंदे मातरम् चे सामूहिक गायन आणि देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. राहुल गांधींच्या या महत्त्वाच्या दौऱ्यामुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसर आपल्या निगराणी खाली ठेवला आहे.
