महत्त्वाच्या बातम्या

भारताची रशियन तेल खरेदी घटली; ऑगस्टमध्ये आयातीत २६ टक्क्यांची घसर

नवी दिल्ली: जागतिक ऊर्जा बाजारपेठेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, ऑगस्ट महिन्यात भारताची रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रशियन तेलाची आयात तब्बल २६.३ टक्क्यांनी कमी झाली आहे. ‘केप्लर’च्या (Kpler) प्राथमिक आकडेवारी नुसार, भारताने ऑगस्टमध्ये दररोज सुमारे २.०८ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात केले, तर जुलै महिन्यात हा आकडा २.८२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतका होता. आयातीत ही लक्षणीय घट झाली असली, तरी रशिया अद्यापही भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार कायम राहिला आहे.

       रशियन तेलाच्या आयातीत झालेली ही घसरण एकाच कारणामुळे नसून त्यामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. यामध्ये चीनची वाढती खरेदी हा सर्वात प्रमुख घटक मानला जात आहे. रशियाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या (डिस्काउंटेड) कच्च्या तेलासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारत आणि चीनमध्ये स्पर्धा वाढली आहे. चीनमधील रिफायनऱ्यां कडून रशियन तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवल्यामुळे भारतासाठी उपलब्ध असलेल्या काही तेलाच्या बॅरल्सवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. याशिवाय, रशियाच्या तेल पुरवठ्यातील काही मर्यादा आणि आशियाई बाजारातील वाढती मागणी यामुळे भारतीय कंपन्यांना आपल्या तेल खरेदीच्या धोरणात काही आवश्यक बदल करावे लागत आहेत. तसेच, देशांतर्गत पातळीवरही भारतातील काही प्रमुख रिफायनऱ्यां मध्ये नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असल्याने कच्च्या तेलाची मागणी काही प्रमाणात मंदावली होती, ज्याचा परिणाम एकूण आयातीवर झाला.

       आयातीत घट झाली असली तरी भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने रशियाचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने आयात केलेल्या एकूण कच्च्या तेलापैकी जवळपास ४५ टक्के हिस्सा हा एकट्या रशियाचा होता. गेल्या काही वर्षांत रशियन तेलाच्या स्वस्त दरामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि रिफायनिंग क्षेत्राला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. मात्र, चीनची आक्रमक खरेदी आणि जागतिक तेल बाजारातील सतत बदलणारी समीकरणे यामुळे भारता समोर स्वस्त कच्च्या तेलाचा पुरवठा अविरत कायम ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. भारत हा जगातील प्रमुख कच्चा तेल आयातदार देशांपैकी एक असल्यामुळे, रशियन तेलाच्या पुरवठ्यातील हे बदल देशाच्या रिफायनिंग क्षेत्रासह पेट्रोल-डिझेलच्या किमती, व्यापार तूट आणि एकूणच ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करू शकतात. आगामी काळात रशियाकडून होणारी तेल खरेदी आणि चीनच्या मागणीचा वाढता ट्रेन्ड याकडे संपूर्ण जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!