महत्त्वाच्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडवा; दादाजी भुसे यांचे शिक्षकांना आवाहन

नाशिक: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, वैज्ञानिक दृष्टिकोन, कला-क्रीडा कौशल्ये आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कर्तव्य शिक्षकांनी पार पाडावे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने भोरे सभागृहात आयोजित ‘आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या दिमाखदार सोहळ्यात शहरातील १४ कर्तबगार आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले असून, शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

       या कार्यक्रमास उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित रंजन, सह आयुक्त स्मिता झगडे, मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, गटनेते अजय बोरस्ते, सेवानिवृत्त शिक्षक संजय कळमकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पुरस्कारार्थींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावून पालकांचा गाढ विश्वास संपादन करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आपली समृद्ध भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. कोल्हापूर, गडचिरोली व पुणे जिल्ह्यातील शाळांच्या यशस्वी प्रयोगांचा दाखला देत, शिक्षकांच्या दृढनिश्चयाला लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जोड मिळाल्यास शासकीय शाळांचे चित्र कसे बदलू शकते, हे त्यांनी आवर्जून सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या आगामी काळात ५० हजारांच्या पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित व सुनियोजित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘शिक्षणाचा कुंभ’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी शिक्षण विभागाला दिले. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृहे, वाचनालय, ई-सुविधा, तिरंगा ध्वज तसेच कला-क्रीडा सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून शिक्षणाचे महत्त्व घराघरांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक केशव गावित यांच्या समर्पित कार्याचे कौतुक करून त्यांनी दुर्गम भागात आदर्श शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा आदर्श इतरांसमोर ठेवला.

      राज्यातील शिक्षक प्रलंबित भरती आणि प्रक्रियेबाबत माहिती देताना मंत्री भुसे म्हणाले की, शासना कडून सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून विना-मुलाखत १३ हजार शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा शिक्षकांनाही या भरतीत सामावून घेण्यात आले आहे. अंतर्गत वाद असलेल्या संस्थांमध्ये शासना मार्फत थेट शिक्षक नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असून, नाशिक महानगरपालिकेने मागणी केलेल्या ३६ पदांपैकी ३१ पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर विलास शिंदे यांनीही आपल्या मनोगतातून महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचल्याचा अभिमान व्यक्त करत, शिक्षकांचे मनोबल वाढवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.

       या सोहळ्यात महानगरपालिकेच्या नवीन अत्याधुनिक शैक्षणिक पोर्टलचे विधिवत उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच एनएमएमएस स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रंजना सखाराम मांडे, ज्योती त्र्यंबकराव भागवत, संगीता बाळासाहेब आढाव, संध्या उमाकांत जाधव, शोभा सुनीलकुमार मगर, योगेश महारु सूर्यवंशी, नाझ परवीन नदीम खान, तब्बसुम अब्दुल कादीर शेख, राजश्री किशोरकुमार सोनेरी, सचिन एकनाथ चिखले, दिलीप काळू गावित, अर्चना दिलीप कापडणीस, रंजना विजय पाटील आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपशिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव या चौदा आदर्श शिक्षकांना उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या रंगारंग आणि प्रेरणादायी सोहळ्याने नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!