महत्त्वाच्या बातम्या

हडपसरमध्ये खळबळ; लॉजमधील वादानंतर २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या, तरुणाला अटक

पुणे: पुण्याच्या हडपसर परिसरातुन एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हडपसर मधील एका खासगी लॉजमध्ये झालेल्या तीव्र वादावादीनंतर एका २२ वर्षीय तरुण मुलीने राहत्या खोलीत सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून हडपसर पोलिसांनी संबंधित तरुणाला तातडीने अटक केली आहे. प्रेमाच्या नात्यातील वाद आणि वारंवार होणाऱ्या खटक्यांमुळे घडलेल्या या घटनेमुळे हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

         पोलिसा कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, मृत साक्षी गायकवाड आणि संशयित तरुण विश्वास वामनराव जगताप-देशमुख (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) यांची एकमेकांशी पूर्वीपासून ओळख होती. त्यांच्यातील नाते संबंधावरून यापूर्वीही कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले होते. विशेष म्हणजे, २०२२ मध्येच विश्वास जगताप हा आपल्याला त्रास देत असल्याबाबतची तक्रार साक्षीने तिच्या वडिलांकडे केली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी संबंधित तरुणाला समजावून सांगत मुलीशी कोणतेही संबंध न ठेवण्याची तक्कल दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्यातील संभाषणाचे आणि भेटींचे सत्र सुरूच राहिले. त्यांच्यात वारंवार किरकोळ व गंभीर कारणांवरून खटके उडत असत आणि तीव्र वादावादी होत असे.

          घटनेच्या दिवशी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे दोघे हडपसर येथील ‘वॉव लॉज’ (Wow Lodge) येथे आले होते. लॉजच्या खोलीत असताना त्यांच्यात पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून कडाक्याचे भांडण व वादावादी झाली. या वादानंतर संशयित तरुण विश्वास जगताप हा प्रचंड रागाच्या भरात ती खोली सोडून निघून गेला. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे आणि तरुणाच्या सततच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळलेल्या साक्षी हिने टोकाचे पाऊल उचलत खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

           हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कायदेशीर कारवाई करत संशयित तरुण विश्वास जगताप याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात असून, या टोकाच्या निर्णयामागील नेमक्या कारणांचा कसून शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

error: Content is protected !!