कृष्णा नदीकाठी कचऱ्याचे साम्राज्य
सातारा जिल्ह्यातील अत्यंत पवित्र मानला जाणारा कृष्णा नदीकाठ गेल्या अनेक वर्षापासून आता कचराकाठ होऊ लागला आहे. ठिक वाई पासून सातारा येथील माहुली परिसरापर्यंत ठिकठिकाणी नदी काठ म्हणजे कचऱ्याचे आगार झाले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरताना दिसत आहे.
अगोदरच पुणे बंगलोर महामार्गावर सेवा रस्त्यावर देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहेच. त्यात आता कृष्णा नदीपात्रालगत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसू लागले आहेत. यामध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर असून नासलेले, कुजलेले अन्न पदार्थ देखील येथे टाकून दिले जात आहेत. याचा परिणाम या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर देखील वाढला असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वर देखील ही कुत्र्यांची टोळकी हल्ला करत आहेत. नदीकाठी आजूबाजूला शेतकरी महिला शेतीकामासाठी येत असतात त्यांनाही याचा मोठा त्रास होत आहे.
या कचऱ्यामध्ये काचेच्या बाटल्या तसेच इतर काचसामान देखील असल्याने असा कचरा ही भटकी कुत्री रस्त्यावर आणत आहेत. त्यामुळे काच फुटून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन प्रवासी यांना वाहने पंक्चर होणे तसेच चालत्या प्रवाशांना पायाला दुखापती होणे असेही प्रकार घडतं आहेत.अशा अनेक घटना यामुळे घडतं आहेत. तसेच या कचऱ्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन त्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांना धोका निर्माण होत आहे.
काही गावच्या ठिकाणी नदीकाठीच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी देखील असल्याने पाणी दूषित होण्याचा देखील मोठा धोका निर्माण होत आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणात झाडे झूडपे असल्याने त्याठिकाणी आजूबाजूच्या गावचे तसेच हॉटेलवाले देखील मोठया प्रमाणात कचरा आणून टाकत आहेत. जर अशा प्रकारे नदीकाठी कचरा पडत राहिल्यास भविष्यात अनेक धोके निर्माण होणार आहेत. त्यासाठी सबंधित विभागाने यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उपाय योजना काय आसाव्यात
नदीकाठी असणाऱ्या गावच्या सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून आपल्या हद्दीत दर महिन्याला स्वछता मोहीम राबवली पाहिजेत.यासाठी सर्व गावचा पुढाकार असावा. जवळपास असणारे हॉटेल, ढाबे यांना समज देऊन कचरा नष्ट करण्याचा सूचना द्याव्यात. नदीकाठी सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. गावकऱ्यांनी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. परिसराचे सुशोभीकरण करावे.
