अत्याचारा विरुद्ध जागर समितीच्या मोर्चाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांवरील अत्याचारा विरोधात आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला.महिला जागर समितीच्या वतीने या जागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है,महिला शक्ती आयी है, नयी रोशनी लाई है…असे म्हणत महिला सक्षमीकरणाची गाणी गात, हातात काठ्या घेऊन अन्याया विरुद्ध घोषणाबाजी करत पुण्यातील युवती व महिला रस्त्यावर उतरल्या. अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.महात्मा फुले वाड्यातील क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.यावेळी आ.नितीन राऊत यांनी उपस्थिती दर्शवली.
मोर्चा मध्ये महिलांनी अत्याचाराविरुद्ध घोषणा दिल्या, गाणी म्हणत महिला सक्षमीकरणासाठी जागर करण्यात आला. तसेच ज्या युवती व महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यांच्यासाठी मेणबत्ती लावून मौन पाळण्यात आले व श्रद्धांजली देण्यात आली. ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यांच्या सोबत उभे राहू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी गुलाबी गँग च्या संगीता तिवारी, निता राजपूत,संगीत पाटणे, स्मिता शेट्टी, प्राची दुधाने आदी उपस्थित होते. तसेच अलका जोशी,रंजना पासलकर,मृणालिनी वाणी, असुंता पारधे, प्रियांका रणपिसे,शारदा नितनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुण्यात आज महिला व युवतींनी मोठया संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी ‘ओय नजर संभाल ‘, महिलांवरील अत्याचार आता बास’ असे लिहलेले टी शर्ट ही बनवण्यात आले होते.महिलांना सक्षम बनवून अत्याचारा विरुद्ध लढा देण्यासाठी महिला सदैव तत्पर असतील व एक दिवस नक्की निर्भय समाज बनवू असा निश्चय करत ‘हम होंगे कामयाब’ या गाण्याने लाल महालातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सांगता करण्यात आली.
