महत्त्वाच्या बातम्या

अटल भूजल योजनेअंतर्गत गावाने केला 31 कोटी 37 लाख लिटर पाणीसाठा : किरकसालमधील जलसंधारण कामाची केंद्र स्तरावर दखल

       माण तालुक्यातील दुष्काळ भागात अटल भूजल योजनेंतर्गत लोकसहभागातून प्रभावीपणे केलेल्या जलसंधारण कामांनी पाणीदार गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या  किरकसाल गावचे जलयोध्दा सरपंच अमोल काटकर यांनी केलेल्या कार्याची केंद्रीय स्तरावर दखल घेतली आहे. दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे परेड कार्यक्रमासाठी किरकसाल (माण) ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल काटकर यांची अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी डॉ. मेघा शिंदे यांनी दिली.

       अटल भूजल योजना ही सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांतील ११३३ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. यात सातारा जिल्ह्यातील ९७ गावात अटल भूजल योजनेंतर्गत कमी सुरू आहे. माण तालुक्यातील किरकसाल गावाने लोक सहभागातून अटल भूजल योजनेंतर्गत कंटूर बंडींग, डीप. सी. सी. टी, कंपार्टमेंट बंडींग, एल. बी.एस, शेत तळी, नाला खोलीकरण, रूंदीकरण इत्यादी जलसंधारणाचे उपचार करण्यात आले. यातून तब्बल ३१:३७ कोटी लिटर पाणी गावच्या शिवारात थांबविण्यात या गावाला यश आले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तलाव दुरूस्ती, गाळ उपसा, ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण, ५ सिमेंट बंधाऱ्याचे काम करण्यात आले.

    केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सुरु झालेली अटल भूजल योजना आमच्या दृष्टीने जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजना कामातील मोलाचे ठरले. या योजनेमुळे शास्त्रीयदृष्ट्या काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करणे, या बाबीवर विशेष लक्ष देण्यात आले. या योजनेच्या प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्टची कामे, तर सी.एस.आर. निधीतून डीप सी. सी. टी., कंपार्टमेंट बंडींग, ड्रीप, मल्चिंग, स्पिंक्लर इत्यादी जलसंधारणाचे उपचार, पाणी बचतीच्या उपाययोजना करण्यात आल्या. तसेच वृक्ष लागवड यामध्ये आंबा, चिंच, जांभुळ, करवंद, सिताफळ, कडूनिंब, वड इत्यादी वृक्ष लागवडीवर मोठा भर देण्यात आला.

 

     वेळोवेळी गावात जलसाक्षरतेची कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. गावच्या परिसरात ४ ठिकाणी पर्जन्यमापक, पीझोमीटर, वॉटर फ्लोमीटर, पाणी पातळी मोजण्यासाठी वॉटर इंडिकेटर याचा वापर केला जातो. या माध्यमातून गावातील पाण्याचा अचूक डेटा शालेय विद्यार्थी गोळा करतात. गावचा डब्ल्यू एस. पी. (जल सुरक्षा आराखडा) तयार केला. गावच्या पाण्याचा ताळेबंद मांडणे व त्यानुसार पिक पद्धतीत बदल याचा अवलंब करण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

गावच्या पाण्याच्या ताळेबंदाचा विचार करता फक्त ८:६३ कोटी लिटर इतक्या तुटीचे अंदाजपत्रक आहे. या गावात लवकरच वॉटर न्यूटल होणे च्या मार्गावर आहे.

       प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी किरकसाल सरपंच अमोल काटकर यांची अतिथी म्हणून निवड झाल्याबद्दल भूजल सर्वेक्षण विभागाचे आयुक्त मालचंद्र चव्हाण, सह संचालक प्रवीण कथने, सातारा जिल्हयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे यांनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!