प्रजासत्ताक दिनाचे दिमाखदार आयोजन करावे! पालकमंत्री मा.ना शंभूराज देसाई यांचे निर्देश
सातारा जिल्ह्यात यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखदार साजरा होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज दूरदश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नियोजनाचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची सातारा जिल्ह्यात सुरुवात झाली होती. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त एकट्या सातारा जिल्ह्यात आठ लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांवर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरू झाले आहे. त्याची छायाचित्रे असणाराही चित्ररथ तयार करावा. कृषी विभाग व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू लागवड व इतर महत्त्वाच्या विषयांशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताक दिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरातदेखील फिरवावेत, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिल्या. तसेच शासकीय इमारतींसह शिवतीर्थ, राजवाडा अशा महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
