जुन्या वैमनस्यातून 19 वर्षीय तरुणाने तलवारीने वार करून 22 वर्षीय तरुणाची हत्या
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून 19 वर्षीय तेजस महेंद्र निगडे याने 22 वर्षीय अमर ऊर्फ चंदू शांताराम कोंडाळकर याच्यावर तलवारीने वार करून हत्या केली. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिरवळ येथील जुन्या औद्योगिक वसाहतीजवळ ही घटना घडली. आरोपीने तलवारीने वार करून अमर कोंडाळकर याचा खून केला. ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या केल्यानंतर तेजस निगडे हातात रक्ताने माखलेली तलवार घेऊन थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप घटनास्थळी पोहोचले. ही हत्या नक्की कशामुळे झाली, कोणत्या जुन्या वादातून ही घटना घडली याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे खंडाळा आणि भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
