MPSC चा पेपरही फुटला? औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित दाव्याने राज्यभर खळबळ
अहिल्यानगर: देशभर गाजलेले नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा झालेला राजीनामा, तसेच ठाण्यातील टीईटी पेपरफुटीची घटना ताजी असतानाच आता स्पर्धा परीक्षांच्या विश्वातून आणखी एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षा देखील फुटली असल्याचा गंभीर आणि सनसनाटी दावा अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे नावाच्या तरुणाने केला आहे. परीक्षेच्या प्रत्यक्ष २ दिवस आधीच काही मोजक्या उमेदवारांच्या हातात प्रश्नपत्रिका आणि त्यांची संभाव्य उत्तरे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप गांगर्डे यांनी केल्यामुळे संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात एकच गजब उडाला आहे.
मागील काही काळापासून देशभरात परीक्षांच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी‘च्या नेतृत्वाखाली मोठे ऐतिहासिक आंदोलन झाले, ज्याच्या तीव्र दबावामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. यापाठोपाठ काही आठवड्यांपूर्वी ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते आणि त्याप्रकरणी बिहारमधून एका संशयिताला अटकही करण्यात आली होती. हे सत्र थांबलेले नसतानाच आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणी जेव्हा पुरावे घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, तेव्हा पोलिसांनी देखील सुरुवातीला ही तक्रार घेण्यास स्पष्ट नकार दिला, असा गंभीर आरोपही तक्रारदाराने केला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा पेपरफुटीच्या घटनांमुळे गुणवान आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरत असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
