शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील खून हल्ला प्रकरणात मोठी कारवाई; गुन्हे शाखेकडून सात आरोपींना अटक
पुणे : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या खून हल्ल्याच्या घटनेप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच आर्म्स ॲक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी अक्षय सुभाष चव्हाण याच्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार कात्रज येथील रिलॅक्स हॉटेलमध्ये कट रचण्यात आला होता. या कटानुसार गुन्ह्यातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी मंदार मारुती किवळे हा २५ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयात तारखेसाठी आला असताना त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. तसेच धारदार शस्त्राने वार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे शहर गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर व आंबेगाव पोलीस ठाण्यांच्या विविध पथकांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय सुभाष चव्हाण (वय २०), अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८), स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८), ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८), सूरज साधू मळेकर (वय २२) आणि सत्यम सदाशिव मोरे (वय २५) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी कात्रज, आंबेगाव पठार, संतोषनगर आणि धनकवडी परिसरातील रहिवासी आहेत.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक आरोपी अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. राजविलास कॉम्प्लेक्स, भारती विद्यापीठ, पुणे) याचा दुसऱ्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. तो सध्या येरवडा कारागृहात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त तपासातून ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
