किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी केली पाहणी
पर्यटन विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज किल्ले प्रतापगड संवर्धन कामाची पाहणी केली. तसेच याप्रसंगी त्यांनी किल्ले प्रतापगड परिसरात सुरू असलेल्या शिवसृष्टी कामाचीही पाहणी केली.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम शौर्याचे प्रतीक असलेला किल्ले प्रतापगड हा आपणा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. प्रेरणेचा हा स्रोत पुढील पिढ्यांसाठी संवर्धित करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आज किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामांचा आढावा घेतला. प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी निर्देश दिले. तसेच प्रतापगडाच्या संवर्धन कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी प्रतापगड संवर्धनाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिली.
तसेच प्रतापगड संवर्धनाचे काम करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा प्रतापगड किल्ला होता त्याच पद्धतीने काम व्हावे. कामात कोणतीही हयगय करू नये. या कामासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे. त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना देऊन किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेतली जाईल, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी आश्वस्त केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, विजय नायडू आदी उपस्थित होते.
