घरफोडी करणाऱ्या सराईत चोराकडून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पुण्यात सराईत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी चोरी, लूटमार, फसवणूक, अशा घटना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एका घरफोडी करणाऱ्या सराईत चोराकडून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये घरफोडी बाबत 29 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चोराने फिर्यादीच्या घराचे गेट व दरवाजाची कडी तोडून त्यांच्या घरातून 10 लाख 51 हजार 90 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला व यातील आरोपीला ताब्यात घेतले. शिवम दत्ता अवचर (वय 19 वर्षे) राहणार कामठे कॉलनी, अभिनव कॉलेज शेजारी नऱ्हे, पुणे व नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते (वय 22 वर्ष) राहणार मनपा शाळेसमोर अण्णाभाऊ साठे हॉलच्या शेजारी वैदुवाडी हडपसर, पुणे या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे तसेच एक विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांचा अधिक तपास करण्यात आला.
सदर आरोपींनी विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दिवाळीच्या दरम्यान दुकानांचे शटर उचकटून, बंद घरी फोडून एकूण सात घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. इतर गुन्ह्यातील चोरी केलेले एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परी 04 पुणे शहर, सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस स्टेशन कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण व राहुल जोशी यांनी केली आहे.
