महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे प्रकरणातील महिलेवर गुन्हा दाखल करण्यासाठी  भाजप महिला आक्रमक 

सातारा:  महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे. त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी अशी मागणी माण तालुका भाजप महिला आघाडीच्यावतीने आज करण्यात आली.

        यावेळी भाजप दहिवडी मंडल महिला अध्यक्षा साधना गुंडगे, भाजप दहिवडी मंडल महिला अध्यक्षा अर्चना सावंत, नगरसेविका निलम जाधव व उज्वला पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे, सारिका पवार, शोभा घोरपडे, सुरेखा पवार, कल्पना पवार, तारा पवार, हिराबाई भिंगारे, रुपाली काकडे, ज्योत्स्ना वाघमारे, मनिषा जाधव, सरिता जाधव, प्रिती दहिवडे आदी महिला उपस्थित होत्या.

          याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१६ साली सदर महिला ही याविषयी त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये केस सुद्धा केली होती. परंतू न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. असे असूनही जवळजवळ नऊ वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने मंत्री महोदयांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे.

          काल एक दोन न्यूज चॅनलला या महिलेने मुलाखत देऊन तिने जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांना याबाबतीत निवेदन दिल्याचे सांगितले. प्रशासनाकडे याबाबतीत तक्रार आली असल्यास प्रशासनाने त्याबद्दल काय निर्णय घेतला होता हे सुद्धा जाहीर करावे. कारण मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे.

आम्ही मंत्री जयकुमार गोरे यांना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांच्याकडून अशी कोणतीच वागणूक आम्हाला मिळालेली नाही. ते आम्हाला बहिणीप्रमाणेच मानतात. प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाचीच वागणूक मिळत असते. असे असताना एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत असेल तर ते समाजासाठी खूपच घातक आहे.सदर महिलेमुळे आमच्यासारख्या सामान्य महिलांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा धोका आहे. आम्हाला घरातून बाहेर पडणे ही अशक्य होईल असे वाटायला लागले आहे. या एका महिलेमुळे समाजातील सर्व महिलाच बदनाम आहेत असा समज होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्व सामान्य घरातील महिला बदनाम होत आहेत.

 

      संबंधित महिलेची सखोल चौकशी करुन त्या महिलेने आज पर्यंत किती जणांना धोका दिला, ब्लॅकमेल केले याची सुद्धा माहिती घ्यावी. आणि हे प्रकरण दहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढून मंत्री महोदयांची बदनामी करण्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत याचीही माहिती घेऊन या महिलेवर आणि तिला पाठिंबा देणाऱ्या किंवा तिला असे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!