महत्त्वाच्या बातम्या

जरांगे-पाटलांच्या प्रकृतीने आंदोलनाला धार; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

जालना: मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदी प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेत होत असलेल्या बदला विरोधात आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपचारांना त्यांनी सक्त नकार दिल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असून, त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. जरांगे-पाटलांची बिघडलेली प्रकृती आणि सरकारकडून अद्याप कोणतेही मंत्री किंवा शिष्टमंडळ भेटायला न आल्यामुळे राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचा तीव्र निषेध करत संतप्त आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग पूर्णपणे रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

         शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. सलग पाच दिवस अन्नपाण्या शिवाय सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर सातत्याने त्यांच्या संपर्कात असून त्यांना उपचाराची विनंती करत आहेत, मात्र जरांगे-पाटलांनी उपचारांना स्पष्ट नकार दिला आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अंतरवाली सराटीत रात्रीच्या वेळीही हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत येथील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासकीय स्तरावर अधिकारी चर्चा करत असले तरी, सरकारचे अधिकृत शिष्टमंडळ जोपर्यंत प्रत्यक्ष येऊन चर्चा करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, या भूमिकेवर जरांगे-पाटील ठाम आहेत.

         सरकारच्या भूमिके बद्दल आणि नेत्यांच्या दुर्लक्षाबद्दल आंदोलकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. जरांगे-पाटलांची प्रकृती चिंताजनक होत चालल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट धुळे-सोलापूर महामार्गावर उतरत रास्ता रोोको आंदोलन सुरू केले. काही आंदोलकांनी शेजारच्या शेतातून लाकडी ओंडके आणून रस्त्यावर टाकले, तर शेकडो तरुण महामार्गावरच आडवे होऊन आणि ठिय्या मांडून बसले. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आंदोलक कोणतीही समजूत काढण्याच्या मनस्थितीत नसून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घटना स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी बिकट होत चालल्याने संपूर्ण राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!