महत्त्वाच्या बातम्या

दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही’; सुनील तटकरेंचा काँग्रेसवर निशाणा

मुंबई: काँग्रेस पक्षाकडून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घुसून जोरदार गोंधळ घातला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसने केवळ दिलगिरी व्यक्त केली म्हणून हा विषय संपत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “काँग्रेसने सुनेत्रा पवारां संदर्भातील केलेल्या पोस्टचा मी तीव्र निषेध करतो. काँग्रेसने याद्वारे आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. त्यांच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसने जरी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी केवळ दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपत नाही. सार्वजनिक जीवनात काय बोलावे आणि कशाचे भान ठेवावे, याचे किमान ज्ञान असावे लागतेपरंतु दुर्दैवाने काँग्रेसचे राज्य पातळी वरील नेतृत्व हे विसरलेले दिसते,” असा घणाघात त्यांनी केला.

काँग्रेस पक्षाकडून अशा प्रकारची खालच्या पातळीवर टीका होण्यामागे राजकीय कारण असल्याचे सांगत तटकरे म्हणाले की, “अजित दादांच्या अकाली निधनानंतर जनतेच्या मनात दादांबद्दल असलेल्या अफाट भावना आणि नुकतीच राज्यभरात पक्षा पलीकडे जाऊन नागरिकांनी व शेतकऱ्यांनी साजरी केलेली दादांची प्रथम जयंती सर्वांनी पाहिली आहे. आज सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीने अत्यंत प्रभावीपणे आणि लोकाभिमुख काम करत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशा प्रकारची हीन पातळीवरील टीका करत राहणार आहेत. मात्र, आम्ही आमच्या कामातून उत्तर देत राहू.”

खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांवरील टीका ही त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून नव्हे, तर त्या एका घटनात्मक पदावर आहेत म्हणून होत आहे, असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, “राऊतांना बहुधा हे माहीत नाहीये की, वहिनी प्रशासनात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. त्या आपले विचार नेहमीच स्पष्टपणे मांडत असतात आणि अनेकदा पत्रकारांशीही संवाद साधतात. त्यामुळे संजय राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला अजिबात गरज नाही.”

दरम्यान, प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या रोषावर स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून वहिनी विविध शासकीय बैठका घेत असतात. अशा बैठकांनंतर पत्रकारां सोबत होणाऱ्या संवादाची व व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्याची असते. पत्रकारांचा रोष हा मुख्यत्वे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यावर होता.” या तांत्रिक मुद्द्याचा विपर्यास करून काँग्रेसने केलेली टीका अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!