धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव दिनानिमित संविधान मूल्यजागर
भारत हा धर्मनिरपेक्ष समाजवादी देश आहे. भारतीय संविधान हे जगभरातील अतिशय उदात्त आणि मानवतावादी संविधान असून सर्व भारतीय नागरिकांच्या आकांक्षा संविधानात आहेत. संविधानाच्या स्वप्नातील भारत उभा करण्याची जबाबदारी ही सर्व भारतीय नागरिकांची आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना जात, प्रांत, धर्म, अहंकार इत्यादी, भारतीय एकात्मता आणि बंधुतेला प्रतिबंध करत आहेत. देशातील जुनी जातीय विषमता आजही देशात मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरून भेदभाव करण्याचे अनेक प्रकार देशात आपण पाहिले आहेत. माणसापेक्षा जात वर्चस्व मोठे ठरते आहे. आपले कोणतेही प्रश्न विधायक पद्धतीने न सोडवता हिंसक पद्धतीने सोडवणारे आततायी लोक देखील याच देशात आहेत. देशात भारतीयत्व रुजवण्याची गरज असताना अजूनही धार्मिक समस्या जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात आहेत. धर्माचे नाव घेऊन मते मागण्याचे प्रकार होत आहेत. देशात हिटलरसारखे लोक तयार होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे.
देशात भारतीयत्व रुजवण्यासाठी जात, प्रांत, धर्म, व्यक्ती यांचे वृथा अहंकार सोडले पाहिजे, असे मत येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील समान संधी केंद्र, विशेष कक्ष, एन.एस.एस विभाग व ज्युनिअर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या ‘भारतीय संविधान अमृत महोत्सवी दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. व्ही. के. सावंत यांच्या मार्गदर्शखाली संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार सातत्याने करण्यात आपली व्यवस्था कमी पडली आहे असे सांगत असताना ते पुढे म्हणाले की, संविधांनाच्या प्रस्ताविकेचा अर्थ देखील अजून नीट समजून घेतलेले नाही. प्रतिज्ञा पाठांतर करणे आणि अर्थ समजून संविधान मूल्याचे आचरण करणे यात फरक आहे. आपल्याकडे आज शाळा महाविद्यालयांनी सतत संविधान जागृती केली पाहिजे. आपल्या देशाची घटना आम्ही भारतीय नागरिकांनी तयार केली असून आम्ही आमचा देश कोणत्याही परकीय राष्ट्राच्या वर्चस्वाखाली असणार नाही, अगर देश भारताच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्ती, संघटना, धर्म यांच्या वर्चस्वाखाली असणार नाही म्हणजेच आम्ही सार्वभौम आहोत. आमची लोकशाही भारतातील प्रत्येक माणसाची किंमत एकच मानते. एक मत, एक किंमत व एकच पत आहे. इथे राजेशाही नाही. त्यामुळे कोणतेही संस्थानिक, घराणी यांना विशेष अधिकार असणार नाही. संविधानाने तयार केलेल्या कायद्याचे सर्वांनी पालन असे करायला हवे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्माण करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे.असे सांगून देशनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. आजही विषमतावादी चातुर्वण्य व्यवस्थेतील भेदभाव तसाच राहिला आहे. सर्व प्रकारचा भेदभाव दूर करण्यासाठी संविधान आचरण व संविधानिक मार्ग हेच हिताचे आहे. आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी काम केले पाहिजे. तेच जनतेला प्रलोभने दाखवून केवळ सत्ता स्थापन करून व्यक्तिपूजा व आपले महत्व वाढवणार असतील तर ते अहितकारक आहे. निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेचे कल्याण करणारे असावेत ते शोषक नसावेत. म्हणून तर मताधिकार हा महत्वाचा हक्क आहे .तो भारतीय जनतेने बजावला पाहिजे . जनता अज्ञानी असणे हे देखील देशाला घातक ठरते. म्हणून सुज्ञ नागरिक तयार करणे ही फार मोठी आव्हानाची गोष्ट आहे.
सत्ता मिळते पण ती शहाणपणाने वापरणे आवश्यक असते. स्वातंत्र्य ,समता,बंधुता ,न्याय ही मुल्ये संविधानात असल्याने आपली घटना ही हितकारी व व्यक्तीला दर्जाची व संधीची समानता देण्यासाठी मार्गदर्शक आहे. महेरबानी ही की आपली घटना ईश्वरवादी आणि दैववादी नाही. नाहीतर देशात अंधश्रद्धाचा रोग पसरला असता. ती माणसाची आहे आणि माणसाच्या आणि देशाच्या हिताचा विचार करते. देशातील गरीब आणि श्रीमंत ही दरी मोठी आहे. चांगले शिक्षण घेऊन जर शास्वत रोजगार मिळाले नाहीत तर तरुणाई देखील उदासीन होत जाईल.
सामाजिक आणि राजकीय जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या लोकशाहीचा उद्देश स्पष्ट करते. संविधान सभेत बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही टिकवण्यासाठी इशारा दिला आहे की, विघातक मार्ग टाळून संविधानिक मार्ग अवलंबले पाहिजेत. देशात व्यक्ती पूजा कदापि करता कामा नये आणि शक्य होईल तितक्या लवकर सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता दूर केली पाहिजे. या देशात राष्ट्राची एकता आणि एकात्मता व आपसात प्रेम आणि सह्भावाचे नाते तयार होण्यासाठी बंधुता ही महत्वाची ठरेल. म्हणून संकुचित जातीय, धर्मीय, मानसिकता सोडून आपुलकी बंधुता या गोष्टी नागरिकांनी आचरणात आणल्या तर देशवासियांचे कल्याण होईल आणि भारत हे एक विविधतेत एकता असणारे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगात सन्मानित होईल, असे ते म्हणाले. तसेच या कार्यक्रमात डॉ.प्रदीप शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमधील योगदानाची माहिती दिली.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकात कांबळे यांनी केले. संविधान प्रास्ताविकेचे प्रकट वाचन प्रा. उत्तम पाटील व विद्यार्थ्यांनी केले. आभार ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शंकर मोटे यांनी मानले तर सूत्र संचालन प्रा. वंदना पै यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. शुभांगी काळे, प्रा. सुवर्णा काळे, प्रा.भुपेश्वर सूर्यवंशी, प्रा. विद्या कांबळे, प्रा. उज्वला नायकुडे, प्रा. बाजीराव नरळे, अधीक्षक अशोक मसणे, ग्रंथपाल माने सर इत्यादीसह महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.
