महत्त्वाच्या बातम्या

पुणे विसर्जन मिरवणुकीत सुरक्षा व्यवस्थेवर भर; महिला-बालकांसह गणेशभक्तांच्या सुरक्षेला प्राधान्य

पुणे: पुण्याच्या दिमाखदार आणि जगप्रसिद्ध अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कडेकोट सुरक्षा आणि नियोजनाची जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक किती तास चालली यापेक्षा ती किती सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडली, हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, अशी स्पष्ट आणि दिलासा दायक भूमिका पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे लाडके गणेशभक्त, विविध मानाची व सामायिक गणेश मंडळे, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण किंवा मनस्ताप सहन करावा लागू नये, यासाठी उच्च दर्जाचे गर्दी व्यवस्थापन आणि चोख सुरक्षा हेच पोलिसांचे मुख्य प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

         विसर्जन मार्गावरील पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि सुरक्षेची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय पथकाने लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकापासून अलका टॉकीज जवळील संभाजी चौकापर्यंत पायी पाहणी करत रूट मार्च काढला. या पाहणी दरम्यान मिरवणूक मार्गावर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींची व गणेश मंडळांच्या अडी अडचणींची सविस्तर पाहणी करण्यात आली. यंदाच्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरात तब्बल १०,००० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अवाढव्य बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरातील चार प्रमुख आणि अतिसंवेदनशील विसर्जन मार्गांवरच साडेपाच हजारहून अधिक पोलीस ताफा शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासूनच आपल्या कर्तव्यावर रुजू झाला आहे. आपत्कालीन किंवा कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीचा जलद मुकाबला करण्यासाठी विशेष पोलीस युनिट्स देखील संपूर्ण मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

       मिरवणुकी दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर पोलिसांनी अत्यंत कडक निर्बंध लादले असून, सुरक्षेच्या कारणाखातर कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा संस्थेला मिरवणूक परिसरात स्वतःहून ड्रोन कॅमेरा उडविण्यास सक्त परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या अधिकृत यंत्रणे मार्फत ड्रोनद्वारे संपूर्ण मिरवणुकीचे उच्च दर्जाचे चित्रीकरण केले जाणार असून, आवश्यकता भासल्यास ते चित्रीकरण संबंधित मंडळांना उपलब्ध करून दिले जाईल. काही मंडळांनी आपला गणपती मुख्य चौकात आल्यावर ड्रोन चित्रीकरणाची विशेष मागणी केल्यास त्यांना केवळ १० ते १५ मिनिटांची मर्यादित मुभा दिली जाऊ शकते. तसेच, प्रत्येक गणेश मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत घेण्याची परवानगी देण्यात आली असून, चौकाचौकात स्थिर वादनासाठी मंडळे व ढोल-ताशा पथकांच्या आमसहमतीने १० मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे.

         मध्यरात्री १२ नंतर ध्वनीक्षेपकांवर (स्पीकर्स) असलेल्या कायदेशीर बंदीच्या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत समंजस भूमिका मांडली. कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील काही मंडळे या वेळेनंतर वादन थांबवून जागेवरच शांत उभी राहतात. यावर भाष्य करताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा प्राण असून वर्षभर या दहा दिवसांची डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या मंडळांच्या भावनांचा पोलीस पूर्ण आदर करतात. त्यामुळे कोणतीही जोरजबरदस्ती न करता, प्रेमाने आणि परस्पर आमसहमतीने या गोष्टी सोडविल्या जातील, जेणेकरून कोणाही नागरिकाला किंवा मंडळाला नाहक त्रास होणार नाही.

         नागरिकांसाठी विशेष आवाहन करताना आयुक्तांनी सांगितले की, विसर्जन सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी शहराच्या विविध भागातून व उपनगरातून अथांग जनसागर लोटणार असल्याने गर्दीचे नियंत्रण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आव्हान आहे. वाहतूक शाखेच्या वतीने मिरवणूक काळातील सर्व वाहतूक व पार्किंग बदला संदर्भातील सविस्तर सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीच प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी ते पर्यायी मार्ग काळजीपूर्वक वाचूनच घराबाहेर पडावे आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडावा, अशी विनंती पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

error: Content is protected !!