पुण्यात जीबीएस आजाराचा प्रसार; ७३ रुग्ण आढळले, एका तरुणाचा मृत्यू
पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचा प्रसार वेगाने वाढत आहे. सध्या शहरात ७३ रुग्ण आढळले असून, त्यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या आजारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जीबीएसच्या लक्षणांमध्ये शरीरात अशक्तपणा, हात-पायांना मुंग्या येणे आणि हालचालीत अडचण येणे यांचा समावेश होतो. या आजारामुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मृत्यू झालेला तरुण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता. आणि मूळचा सोलापूरचा होता. त्याला काही दिवसांपूर्वी जीबीएसची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊन तो काहीच दिवसांपूर्वी बरा होऊन रुग्णालयातून बाहेर येणार होता. मात्र, त्याला पुन्हा त्रास सुरू झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
शहरात जीबीएसचा प्रसार थांबवण्यासाठी पुणे महापालिका उपाययोजना करत आहे. नागरिकांनी शरीरातील बदल किंवा लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
