महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात नामांकित कंपनीला ३ कोटींचा गंडा; बनावट इनव्हाईसद्वारे फसवणूक

पुणे: पुणे जिल्ह्यातील पौड परिसरातून एक अत्यंत खळबळ जनक आणि गंभीर कॉर्पोरेट फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्याच अंतर्गत कर्मचाऱ्याने बाहेरील सप्लायर कंपनीशी संगनमत करून प्रत्यक्षात कसलाही कच्चा माल न पाठवता बनावट इनव्हाईसच्या आधारे कंपनीची तब्बल ३ कोटी ३० हजार रुपयांची घसघशीत आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तिघा मुख्य व्यक्तींसह संबंधित सप्लायर कंपनीच्या संशयितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, औद्योगिक वर्तुळात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

      पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, प्रभा इंजिनिअरींग कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर अविनाश बाळासाहेब आडमुठे (वय ४२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल श्रीमंत पवार (रा. शिंदेवाडी, मूळ रा. देवधरा, धाराशिव), सरिता रोकडे, तेजश्री विचारे आणि उत्तम विचारे (सर्व रा. सिल्व्हर स्प्रिंग, तळोजा एमआयडीसी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घोटावळे येथील प्रभा इंजिनिअरींग कंपनीमध्ये चार चाकी वाहनांच्या वायपर मोटार, शीट मेटल्सचे पार्ट, जॅक आणि स्टेप्स बनविण्याचे उत्पादन घेतले जाते. यासाठी विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल मागविला जातो. तळोजा एमआयडीसीमधील ‘बेटर इस्पात प्रा. लि.’ या कंपनीकडून २०२१ पासून एच.आर.पी.ओ. (HRPO) शीटचा कच्चा माल खरेदी केला जात होता. कंपनीच्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये अनिल पवार हा कर्मचारी कार्यरत असून, त्याच्याकडे कारखान्यात येणाऱ्या मालाची नोंद ठेवणे, रेकॉर्ड अद्ययावत करणे, कच्चे मटेरियल बिल अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये सबमिट करणे आणि सप्लायर पार्टीचे पेमेंट झाले किंवा नाही याची खात्री करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती.

     डिसेंबर २०२५ मध्ये कंपनीने केलेल्या मासिक लेखापरीक्षण आणि सॉफ्टवेअर तपासणी दरम्यान थर्ड पार्टीकडे नियमांपेक्षा जास्तीचा माल गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कंपनीने सखोल पडताळणी सुरू केली असता, पुशा मेटल्स आणि प्रामुख्याने बेटर इस्पात कंपनीकडून आलेल्या काही बिलांसोबत वजन काट्याच्या अधिकृत पावत्या जोडलेल्या नसल्याचे उघडकीस आले. या गडबडीची पाळेमुळे शोधण्यासाठी कंपनीने एका कायदेशीर तज्ज्ञाची (वकिलाची) नेमणूक केली आणि संशयितांना वकिलासमोर चौकशीसाठी बोलावले. मात्र, यातील एक संशयित ओंकार सोनवणे चौकशीसाठी न जाता तेव्हापासून कामावरूनच फरार झाला. चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमत करून प्रत्यक्षात कसलाही माल कंपनीत न पाठवता तब्बल ५४६ टन एच.आर.पी.ओ. शीटचे बनावट इनव्हाईस तयार केले. त्यावर माल प्रत्यक्ष आल्याच्या आणि रिसीव्ह झाल्याच्या खोट्या नोंदी मारून ती बिले अकाऊंट डिपार्टमेंटला सादर करण्यात आली. या खोट्या बिलांच्या आधारे कंपनीने वेळोवेळी बेटर इस्पात कंपनीच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले, ज्यामुळे आजच्या बाजार भावानुसार कंपनीची तब्बल ३ कोटी ३० हजार रुपयांची फसवणूक झाली. नंतर मुंबई कार्यालयात झालेल्या चौकशीत बेटर इस्पातच्या मालकांनी अनिल पवारसोबत मिळून हा बनावट कागदपत्रांचा खेळ रचल्याची कबुली दिल्यासारखी माहिती समोर आली. या प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!