फेंगल चक्रिवादळामुळे पुणेकर गारठले..दक्षिण भारतात वादळीवाऱ्यासह पावसाची परिस्थिती तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली असल्याचे दिसत आहे. तापमानाचा पारा अगदी खाली घसरत असून पश्चिम महाराष्ट्रासह मध्ये तापमान अगदी कमी राहील.फेंगल चक्रीवादळ हे वेगाने पुढे सरकत आहे याचा वेग ताशी 13 किलोमीटर असून भारताच्या बाजूला असणाऱ्या गुजरात पासून काही अंतरावर सायकलोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण होत आहे. याचा परिणाम निश्चितच भारतात पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतात दाट धुके पसरले असून दक्षिण भारतात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती व उत्तरेकडून थंड वाऱ्याची लाट पसरल्याने महाराष्ट्रातही थंडी वाढत आहे. जळगाव मध्ये पुढील तीन दिवसात थंडी तीव्र असणार आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातहि थंडीची सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नाशिक मधील निफाड येथे पारा 8.3° घसरला असून सातारा शहरात 12° महाबळेश्वरमध्ये 11.8° तापमान आहे. पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात तापमानाचा पारा 2° ते 3° घसरण्याची शक्यता आहे. पुणे, लोणावळा, शिरूर भागात तापमान 10° असून मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर,रायगड, पालघर येथे मागच्या दहा वर्षात तापमानाची सर्वात कमी नोंद काल झाली आहे. जळगाव मध्ये पुढील दोन दिवस तापमान 9° पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
