महत्त्वाच्या बातम्या

फ्लाइंग ऑफिसर आशुतोष शिवथरेचा पाचवड येथे सन्मान

भुईंज: विविध कला, क्रीडा गुणांसोबत अभ्यासाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी घेतलेल्या मेहनतीतून आशुतोष शिवथरे सारखे कर्तबगार विद्यार्थी देशसेवेत दाखल होतात. असे अनेक कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम तिरंगामध्ये सुरू आहे, असे गौरवोद्गार भुईंज प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पार्थ फुटाणे यांनी पाचवड, ता. वाई येथे काढले.

        पाचवड येथील तिरंगा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आशुतोष शिवथरे याची भारतीय वायू सेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली. त्या बद्दल डॉ. पार्थ फुटाणे यांच्या हस्ते आशुतोषचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. फुटाणे म्हणाले, तिरंगा स्कूलने अनेक क्षेत्रात दिलेल्या कर्तबगार विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राजेश स्वामी अभ्यासिकेद्वारे येथील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची किमान ओळख होत आहे. क्रीडा क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी कौतुकास्पद आहे.

       आपल्या जडणघडणीत तिरंगाचा वाटा मोठा आहे, असे नमूद करून आशुतोष शिवथरे यांनी सांगितले, की तुम्ही खेड्यातून येता की शहरातून येता, तुमचे शिक्षणाचे माध्यम कुठले हे महत्त्वाचे नसून तुमच्या मनातील जिद्द महत्वाची आहे. तिरंगा स्कूलमध्ये मला चांगले शिक्षण मिळताना क्रीडा सुविधा मिळाल्या त्याचा खूप मोठा फायदा झाला. क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांनी प्रत्येक पावलावर दिलेले पाठबळ आणि इतर सर्व शिक्षकांनी माझ्यात निर्माण केलेला आत्मविश्वास मोलाचा ठरला. मी जे झालो तेच तुम्ही व्हा असे मी म्हणणार नाही तर कुठल्याही क्षेत्रात जावा पण यशस्वी व्हा. त्यासाठी ध्येय मात्र दहावीपासूनच निश्चित करा.शीतल बाबर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांचे स्वागत वनिता पवार यांनी केले तर वैशाली कुंभार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.कार्यक्रमास शंकर शेवाळे, विजयकुमार शिवथरे, वनिता शिवथरे, गिरीराज पवार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!