बामणोली येथे बोट रॅलिच्या मध्यमातून मतदान जागृती
प्रत्येक घरोघरी व प्रत्येक गावांमध्ये मतदान जागृती करण्यात येत आहे तसेच बामणोली येथून तेटली या ठिकाणी बोट रॅली व्दारे मतदान जागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध कार्यालयांच्या वतीने जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत बामणोली येथे आयोजन करण्यात आले होते. बामणोली येथे मानवी साखळीच्या माध्यमातून व बोट रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच बामणोली येथील प्राथमिक केंद्र शाळा बामणोली शाळेतील श्रृतीका पवार, प्राथमिक शाळा पावशेवाडी शाळेतील श्रेया पवार यांनी भाषणाच्या माध्यमातून मतदान जागृती केली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल बामणोली शाळेतील विध्यार्थ्यानी पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी भाषणाच्या व पथनाट्यांच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान करावे अशी जन जागृती करण्यात आली.
मतदानासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावे. दि. २० नोव्हेंबर रोज सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असा संदेश देणाऱ्या मानवी साखळीचे आयोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. बामणोली येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती जावली व अन्य शासकीय कार्यालयांच्यावतीने मानवी साखळी तयार करण्यात आली असून सदर कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,वनक्षेत्रपाल अधिकारी वन्यजीव बामणोली व्ही.डी.बाटे तसेच सर्व विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच बामणोली विभागातील प्राथमिक शाळेतील शिक्षक,विध्यार्थी, अंगणवाडी परिवेक्षिका,शिक्षीका, सेवीका,बोट व्यवसायीक, विभागातील ग्रामस्थ आदी लोक उपस्थित होते.
कोयनेच्या तिरी मतदानाची शपथ कोयना जलाशयाच्या तिरी बामणोली येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाचा हक्क बजवा….मातृभूमीची शान वाढवा, एक जागरूक मतदार…. आपले मतदान लोकशाहीचा प्राण, लोकशाहीचा आधार, चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया….लोकशाही रूजवूया, १८ वर्षाचे वय केले पार….मिळाला मतदानाचा अधिकार, मत आहे आमचा अधिकार….कधीही करू नका बेकार, भविष्याची कल्पना करा आणि योग्य पध्दतीने मत द्या, छोडकर सारे काम….चलो करे मतदान, चला जावूया मतदान करायला, मतदार राजा जागा हो…..लोकशाहीचा धागा हो, वृध्द असो वा जवान सर्वजण करा मतदान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सेल्फी पॉइंट मतदान जागृतीचे माध्यम
वन विभागच्या माध्यमातून माझा सह्याद्री माझा अभिमान ,व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा सथ्ळ, अशा प्राण्याच्या पोस्टच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावणार अशा सेल्फी पॉइंट उभारण्यात आलेले होत त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लिंक
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील सुजाण मतदारांनी विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये 100 टक्के सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यामध्ये सक्रिय पुढाकार घ्यावा यासाठी क्रांती,शोर्य, समाजसुधारणा यांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्हा निश्चित 100% मतदान करेल त्यासाठी सर्व मतदार यांनी ई प्रतिज्ञा घेऊन शपथ घ्यावी व इतर मतदार यांनाही आवाहन करावे तसेच खालील लिक वर आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या असे आव्हान करण्यात आले आहे.
