मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी अद्याप फरार, सुप्रिया सुळे गावकऱ्यांच्या भेटीला
मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अडीच महिने झाले तरीही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन आरोपींना वाचवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य कारणे सांगून तपास लांबवला जात असल्याची चर्चा आहे. गावकऱ्यांच्या संतापाचा परिणाम म्हणून खासदार सुप्रिया सुळे मसाजोग येथे दाखल होत आहेत. त्या देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
गावकऱ्यांचा संताप: “फरार आरोपीला अटक करा!”
ग्रामस्थांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून, त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, फरार आरोपी कृष्णा आंधळेला त्वरित अटक झाली पाहिजे. गावकऱ्यांनी प्रशासनावर निष्क्रीय तेचा आरोप केला असून, “सरकारने जर न्याय दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा दिला आहे.
शरद पवार, रोहित पवार यांचीही मदत
या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनीही लक्ष घातले आहे. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन वेळा फोनवर चर्चा केली. रोहित पवार यांनी शिक्षणा संबंधी अडचणींबाबत चर्चा केली.
सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची चर्चा
सुप्रिया सुळे या गावकऱ्यां सोबत चर्चा करणार असून, त्यांनी स्पष्ट केले की,
“आम्ही घटनाक्रम समजून घेऊन गुंडगिरी, अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणा मागील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करू. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणी करत आहे, हे शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत.”
पोलीस तपासाबद्दल प्रश्नचिन्ह
धनंजय देशमुख यांनी सांगितले की,
“घटना नंतर आरोपी भागातच असताना त्याचा मोबाईल सुरू होता, तरीही पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. आंदोलन करणाऱ्या लोकांना घरी पाठवण्याचा जास्त प्रयत्न झाला, पण आरोपीला अटक करण्यासाठी काहीही केलं गेलं नाही. आम्ही ही बाब सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडणार आहोत.”
गावकऱ्यांची पुढील भूमिका
गावकऱ्यांनी ठरवलं आहे की, जर आरोपीला लवकर अटक झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल. सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले असून, आता सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर पुढील दिशा स्पष्ट होईल.
