महत्त्वाच्या बातम्या

रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार

     रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया (आठवले) पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी पक्षाची आग्रही मागणी होती. जागांची मागणी मान्य होत नसल्याने पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते व पक्षाचा कोणताही पदाधिकारी महायुती च्या व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. अखेर महायुती मध्ये काल  मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती देताना सोनवणे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला शिवसेना च्या कोट्यातून धारावी मतदारसंघ आणि भाजप च्या कोट्यातून कालिना हे  मुंबईतील दोन मतदार संघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आले आहेत. त्यामूळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे. त्यानुसार आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत.
 महायुती ची सत्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच 4 महामंडळ अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक पदे जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्य पदे तसेच महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, दलितांच्या विकासासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला सारून नव्या दमाने भाजप शिवसेना रिपाइं राष्ट्रवादी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे असे आवाहन  आठवले यांनी केले.

     त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारात सक्रिय सहभागी होणार आहोत. असे परिपत्रक परशुराम वाडेकर राज्य संघटन सचिव, संजय सोनवणे शहराध्यक्ष,  बाळासाहेब जानराव महा सचिव,  डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे महाराष्ट्र सदस्य, श्याम सदाफुले सरचिटणीस पुणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!