1 नोव्हेंबर ला वासोटा दुर्ग होणार सुरू ?
सातारा जिल्ह्याचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स याचा आवडता वनदुर्ग म्हणून वासोटा किल्ल्याची ओळख आहे. जावली तालुक्यातील दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. परंतु या वर्षी ऑक्टोबर महिना उलटून गेला तरी वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला झालेला नाही. दरवर्षी प्रमाणे १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर पर्यंत वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला केला जातो परंतु या वर्षी अधून मधून पाऊस असल्यामुळे पर्यटनासाठी खुला केला नाही. सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. तरी ही वासोटा किल्ला पर्यटन खुला करण्यासाठी वन विभागाकडून कोणत्या प्रकारचा हिरवा कंदील मिळलेला नाही. वासोटा किल्ला पर्यटन फक्त 2 ते 3 महिनेच चांगल्या प्रकारे सुरू असते, ज्यावेळी कोयनेचे पात्र भरलेले असते त्यावेळी ट्रेक करण्यासाठी जास्त चालावे लागत नाही. त्यामुळे गडप्रेमी,पर्यटक हे या २-३ महिन्यात वासोटा येथे जाण्यासाठी आग्रह धरत असतात. परंतु वन विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारे स्पष्ट सूचना न मिळाल्याने बोट व्यवसायिक संभ्रमात आहेत. त्यामुळे बोट व्यवसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच वन विभागाने संभाव्य दिनांक १ नोव्हेंबर अशी दिलेली असून अजून बोट व्यवसायिक किंवा बोट क्लब संस्था यांना कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. तरी वन विभागाने 1 तारखेपासून किल्ले वासोटा पर्यटन सुरू करावे या साठी स्थानिकामधून मागणी होत आहे.
“वासोटयाला जंगल ट्रेकिंगसाठी जाताय तर हे नक्की वाचा”
वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना बामणोली वरून किंवा मुनावळे, दत्तमंदीर या ठिकांनाहून बोटीने वासोटयाला जावे लागते. त्यांनतर वासोटयाच्या पायथ्याला पोचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने सुर्यकिरणे जमिनीपर्यत पोहच नसल्यामुळे जमिनीची ओल लवकर कमी होत नाही. त्यामुळे जळू (काणीट)(LEECH) चे प्रमाण जास्त असते. हा किटक पायाला लागल्यावर रक्कत पितो व पडून जातो. परंतु काही प्रमाणात हे किटक विषारीही असू शकतात व जास्त प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यास जीवास धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी वासोटयाला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच जळू लागल्यास मिठाचे पाणी, तंबाकू ओला करून त्यावर लावल्यास तो पडून जातो. अश्या प्रकारे काळजी घेवू शकता.
“आमचा उदरनिर्वाह हा बोट व्यवसायावर अवलंबून आहे. वन विभाग १६ ऑक्टोबर ला वासोटा सुरू करतात. परंतु या वर्षी ऑक्टोबर महिना संपत आला तरी वासोटा किल्ला सुरू झालेला नाही. तरी वनविभागाने 1 तारखेलाच वासोटा किल्ला पर्यटनासाठी सुरू करावा. “
लक्ष्मण विष्णू साळुंखे “
बोट चालक, ब्राविमश्वर बोट क्लब, शेंबडी
“दरवर्षी वासोटा किल्ला हा पर्यटकांना आकर्षित करत असतो, तसेच १६ ऑक्टोबर पासून पर्यटक चौकशी करत असतात परंतु वासोटा सुरू नसल्याने पर्यटक नाराज होत आहेत त्यामुळे आमच्या बोटिंग व्यवसायावर मोठा फटका बसत आहे.”
दिनकर भोसले,
चेअरमन ,केदारेश्वर बोट क्लब मुनावळे
“दि.१६ ऑक्टोबर पासून बोटी तयार केलेल्या आहेत. परंतु वासोटा किल्ला पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. तरी १ तारखेला वासोटा सुरू करण्याबाबत वन विभागाच्या संस्थेच्या वतीने मागणी केली आहे. वासोटा सुरू करण्याबाबत वन विभागाने संमती दर्शवली आहे. तरी वासोटा किल्ला 1 तारखेला सुरू करतील अशी अपेक्षा आहे.
धनाजी संकपाळ,
चेअरमन, भैरवनाथ बोट क्लब बामणोली
