महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थीनींनी साजरा केला झाडांचा दशकपूर्ती सोहळा

      आपल्याच जेष्ठ भगिनींनी लावलेल्या इवल्याशा रोपांचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात येथील प. म. शिंदे कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी साजरा केला. आता वृक्षात रुपांतर झालेली ही रोपे पाहताना झालेला आनंद सेंद्रिय केक कापून, फुगे फोडून साजरा केला.ओसाड माळरानावर, रणरणत्या उन्हात, चिमुकल्या हातांच्या मोठ्या कष्टाने आंब्याच्या, नारळाच्या व बाॅटल पामच्या झाडांचे २०१४ – १५ साली लागवड करण्यात आली. आदर्श शिक्षक कै. पुरुषोत्तम जाधव व कलाशिक्षक अरविंद माने यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व रोपांचे संगोपन विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थीनी व शिपाई यांनी जीवापाड केले. हरित सेनेकडून मिळणारे अनुदान सुध्दा वृक्ष संवर्धनासाठी वापरण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणून नारळ ११०, आंबा ९० व बाॅटल पाम ४४ अशी रोपे जगली व अतिशय जोमाने वाढली. या आंब्याच्या, नारळांच्या फळ विक्रीतून चांगले आर्थिक उत्पन्न विद्यालयास मिळत आहे. या झाडांभोवती विविध प्राण्यांच्या व वनस्पतींच्या माहितीचे फलक सुध्दा लावण्यात आले आहेत.

      आज या बागेचा दहावा वाढदिवस समाजसेविका डाॅ. किरण कारंडे, लालासाहेब ढवाण, मुख्याध्यापक संगिता काटकर, गुरुकुल प्रमुख विष्णु काटकर, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने झाडांना फुगे, झुरमुळ्या, फुले आदी साहित्याने सजविण्यात आले होते. झाडाभोवती फुलांच्या पाकळ्या पसरण्यात आल्या होत्या. रांगोळी काढण्यात आली होती. गाळाच्या मातीचे, शेणाचे सेंद्रीय केक तयार करण्यात आले होते. हे केक कापून त्याची माती, खत हे झाडांना घालण्यात आले. विद्यालयाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!