‘कुठे तरी कधी तरी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
माण तालुक्यातील मलवडीचे प्रतिभावंत कवी मोहसीन आतार याच्या ‘कुठे तरी, कधी तरी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन त्याचे वडील वजीर आतार व आई मुनीरा आतार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.मलवडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमास समाजसेवक जीवन इंगळे, जेष्ठ कवी ताराचंद आवळे, सरपंच दिपाली जगदाळे, हेमलता मगर, डाॅ. वैभव तिवाटणे, मुख्याध्यापक मनोजकुमार बंडगर, उपसरपंच सतीश महाजन, रफीक मुलाणी, दादासाहेब भोसले, रसुल आतार, संतोष बोराटे, अशोक सावंत, किशोर देवकर, रविंद्र कदम, विनोद मगर, अनिल नवले, विनय फरकुटे, अजित काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवन इंगळे म्हणाले, ‘कुठे तरी, कधी तरी’ ने साहित्य क्षेत्रात चांगल्या कवितासंग्रहाची भर पडली आहे. ग्रामीण भागातील या कवीने वेगवेगळ्या विषयांना हात घालत आपल्या भावनांना कवितांच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आहे. ताराचंद आवळे म्हणाले, मोहसीनचं साहित्य माणदेशातील अस्सल सोनं आहे. कविता शिकण्यापेक्षा जगता आली पाहिजे. हे मोहसीनने नेमकं ओळखलं आहे. त्यामुळेच तो एस.टी. त काम करत असताना सुध्दा आपली संवेदनशीलता जागृत ठेऊन कविता करतोय ही खरंच मोठी गोष्ट आहे. संतोष बोराटे म्हणाले, भावनांचा उत्कट अविष्कार म्हणजेच कविता. समाजाचं प्रतिबिंब कवितांमधून उमटतं. एस. टी. महामंडळात वर्कशॉप मध्ये रोजीरोटीसाठी काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्याचा कवितासंग्रह आज प्रकाशित होतोय याचा मला मनस्वी आनंद होतोय. यावेळी मोहसीनने ‘बाकावरची ती’ ही कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी केले. मोहसीन आतार यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र खरात यांनी आभार मानले.
