सांगली मधील वायुगळतीत 2 महिलांचा मृत्यू तर 7 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु
सांगली जिल्ह्यातील खत कारखान्यात वायुगळती झाली. कडेगाव येथील शाळगाव MIDC म्यानमार केमिकल कंपनीमध्ये वायुगळती झाल्याने आग लागली. काल संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 1 सुरक्षा रक्षक व 2 महिलांचा समावेश आहे.
सांगलीतील शाळगाव एमआयडीसीच्या म्यानमार कंपनीमध्ये गुरुवारी साडेसहाच्या सुमारास वायू गळती झाली व भीषण आग लागली यामध्ये जखमी झालेल्या सात जणांना रात्री कराड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या मध्ये दोन महिलांनी जीव गमावला असून सुचिता उथळे (वय 50) रा.येतगाव, जिल्हा सांगली तर नीलम रेठरेकर (वय26)रा. मसूर जिल्हा सातारा अशी त्यांची नावे आहेत. आगीत जखमी झालेल्यांवर सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेत कंपनी मालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या मते प्लांटमधील अनुभट्टीच्या स्फोटामुळे अमोनियाचे रासायनिक धुर निघत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेमागे अमोनियाच्या संशयास्पद वायूचे कारण दिले आहे. अनुभट्टीचा स्फोट व गळतीचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
