महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात महायुतीच्या उमेदवाराने रा.स.प.चे नाव बॅनरवर वापरल्याबद्दल तक्रार दाखल

सातारा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या बॅनरवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नाव वापरल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजी माने यांनी सातारा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.

        राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ ची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष महायुती बरोबर युतीत नाही. त्यामुळे  रा.स.प. महायुतीत असल्याचे दाखवून मतदारांना बॅनरबाजीच्या माध्यमातून आमिष दाखवल्याचे तक्रारीत  म्हटले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शिवाजी भगवान माने, सातारा जावळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. युतीच्या उमेदवारांनी बॅनरवर राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीत असल्याचे भासवले आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. ही विनंती करण्यात आलेली आहे.

     सदर बॅनर सज्जनगड रोड, परळी फाटा, आसनगाव, शेरेवाडी, कुमठे, कण्हेर, मेढा, जावळी व परळी सातारा भागातील गावात लावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजी माने यांनी याबाबत निवडणूक आयोग, सातारा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सातारा यांनाही माहितीसाठी प्रत पाठवलेली आहे. सदर बॅनरवर आपलं आमदार.. कामगिरी दमदार… अशा आशयाचे बॅनर लावताना भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पार्टी- रिपाई – रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार असा उल्लेख केल्यामुळे तक्रार दाखल केल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रचारक डॉ. रमाकांत साठे व सातारा जावळी विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शिवाजी माने यांनी कळविले आहे. दरम्यान, याबाबत लेखी तक्रार केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे आता सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!