साताऱ्यातील श्री क्षेत्र सज्जनगड येथे श्रीविष्णू पंचायतन यागाचे आयोजन
सातारा येथील राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असलेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीविष्णू पंचायतन यागाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथील पिण्याच्या पाण्याच्या तलावा नजीक भव्य आयोध्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिर मंडपाची गुरुवारी समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक योगेश बुवा रामदासी व मान्यवर ब्रह्मावृंदाच्या उपस्थितीत स्थलशुद्धी व जलशुद्धीकरण मंत्र उच्चाराने केले.
सकाळी नऊ वाजता या मंदिराच्या भव्य सेवा मंडपात वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा शुभप्रवेश झाला व प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन, दीप प्रज्वलन, शांति मंत्रांचे पठण व आशीर्वचन झाले. या भव्य महोत्सवासाठी अनेक थोर वैदिक, संत, विद्वान आणि धार्मिक परंपरेतील अध्यात्मिक पिठांचे परमपूज्य पिठाधिश यांची उपस्थिती असणार आहे व सर्व भक्तांसाठी त्यांच्या दर्शनासोबत विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जाणार आहेत. महोत्सवासाठी सुप्रसिद्ध निरूपणका आणि प्रवचनकार श्रीमती मंदाकिनी ताई गंधे यांचे सज्जनगडावर आगमन झाले आहे. सज्जनगडावरील यज्ञ शाळेत विष्णू पंचायतन यागाची तयारी झाली असून देशातील अनेक मान्यवर ब्रह्म बंधनाच्या हस्ते हा यज्ञ 19 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील.
15 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता वेदमूर्ती यज्ञकांच्या हस्ते जप करण्यात आला व 8 वाजता पंचायतन देवता व ग्रंथांची शोभयात्रा निघाली. त्यानंतर सकाळी 11 ते 12.30 दरम्यान परमपूज्य परम श्रद्धेय मंदाकिनीताई गंधे यांचे प्रवचन होते. चार ते सहा या वेळेत पुण्यातील समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे कीर्तन आयोजित केले आहे. रात्री 9 वाजता पंडित कृष्णेंद्र वाडीकर (नरसोबाची वाडी)यांची गायन सेवा पार पडणार आहे. तरी सर्व भक्तांनी या महोत्सवास उपस्थिती दर्शवावी असे समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
