सोशल मीडिया मेसेजच्या वादातून इंदापूर मधे तरुणाची निर्घृण हत्या
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शनिवारी रात्री एका इन्स्टाग्राम पोस्टवरून झालेल्या भांडणातून 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
बहिणीचा फोटो असलेल्या सोशल मीडिया मेसेजवरून झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली.
आकाश मुशा चौगुले (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर या प्रकरणे राजेश उर्फ तात्या साहेब पवार या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलिसांनी पाच तासाच्या आत घटनेतील आरोपीला गजाआड केल आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश उर्फ तात्यासाहेब पवार व आकाश चौगुले हे एकाच गावातील रहिवासी असून राजेश याने आकाशला त्याच्या बहिणीचा फोटो मेसेज करून इंस्टाग्राम वर पाठवला. यावरून आकाश चौगुले आणि आकाशची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार यांच्याकडे घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. दरम्यान आकाश चौगुले यांनी राजेश याला तू माझ्या बहिणीचा फोटो इंस्टाग्राम वर मला का पाठवला असा जाब विचारला त्याचाच राग मनात धरून राजेश पवार यांनी आकाशचा गळा दाबून त्याचे डोके दगडावर आपटले. आकाश काही हालचाल करत नव्हता हे पाहून राजेश पवारने तिथून पळ काढला नंतर आकाश चौगुले याला उपचारासाठी लासुर्णे येथील देसाई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले असता डॉक्टरांनी आकाशचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची वालचंद नगर पोलिसांना माहिती मिळताच प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.
