माण तालुक्यात भाजपची वज्रमूठ; पुणे पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना एकतर्फी मताधिक्य मिळण्याचा कार्यकर्त्यांचा दावा!
दहिवडी: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली असून, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून त्यांना पदवीधर युवकांचा अभूतपूर्व आणि उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माण तालुक्यात भाजपची राजकीय पकड नेहमीच मजबूत राहिली आहे. त्यामुळे यंदाच्या पदवीधर निवडणुकीतही माण तालुक्यातून भाजपच्या उमेदवारालाच ऐतिहासिक मताधिक्य मिळणार असा ठाम विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
माण तालुक्यातील राजकीय गणिते आणि वर्चस्वाचा विचार करता, म्हसवड नगरपरिषदेचे सर्वच्या सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर दुसरीकडे, दहिवडी नगरपंचायतीचा अपवाद वगळता जवळपास सर्वच नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी पूर्ण ताकदीने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात उतरले आहेत. गावपातळीवर पदवीधरांशी थेट संपर्क साधत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची यंत्रणा अत्यंत सूक्ष्म रीतीने राबवण्यास सुरुवात केली आहे.
पदवीधर तरुणांचा डॉ. स्मिता जाधवांना कौल.!
शिक्षण, सामाजिक कार्य आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे डॉ. स्मिता जाधव यांची प्रतिमा सुशिक्षित व अभ्यासू उमेदवार म्हणून पदवीधरांमध्ये तयार झाली आहे. माण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारी, पदवीधरांचे प्रश्न, स्थानिक विकास आणि युवकांसाठीच्या रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर भाजपचे संघटन कटिबद्ध असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुण पदवीधर वर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील सर्व प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे पूर्ण वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय ताकद या सगळ्याच्या जोरावर माण तालुक्यातून डॉ. स्मिता जाधव यांना एकतर्फी व रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विरोधी पक्षांची कोणतीही रणनीती या बालेकिल्ल्यात यशस्वी होणार नाही, असा खणखणीत इशाराच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने दिला आहे.
