सातारा

“मोरेवाडीत वृक्षतोडीचा धडाका; परवानग्यांबाबत ग्रामस्थांचा सवाल, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष”

शासकीय व खासगी जागेतील झाडे तोडल्याचा ग्रामस्थांचा दावा; वनविभाग व महसूल प्रशासनाच्या पाहणीकडे लक्ष
आनेवाडी : जावळी तालुक्याच्या पूर्व भागातील सायगाव विभागातील मोरेवाडी हद्दीत सायगाव–दरे खुर्द रस्त्यालगत गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय जागे सह काही खासगी जागेतील झाडेही संबंधितांची पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता तोडली जात असल्याचा दावा नागरिकांनी केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
मोरेवाडी परिसरात वाई तालुक्यातील एका ठेकेदाराकडून वृक्षतोड केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासकीय जागेवरील झाडे तोडण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का, तसेच खासगी जागेतील झाडे तोडण्यासाठी जमीन मालकांची संमती घेण्यात आली आहे का, याबाबत स्थानिक नागरिकांना स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
       गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणातील वृक्षसंपदा नष्ट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जावळी तालुक्यात अशा प्रकारे वृक्षतोड होत असल्यास संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
       दरम्यान, वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराकडून स्थानिक नागरिकांना योग्य माहिती न देता काम सुरू ठेवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत की नाहीत, याची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खासगी जागा मालक पोपट मोरे, धर्मराज मोरे, लक्ष्मी साहेबराव मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांकडूनही स्पष्टतेची गरज
या संदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगतची झाडे हटविण्यास सांगण्यात आले आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
मोरेवाडी हद्दीत सुरू असलेल्या वृक्षतोडीची वनविभाग तसेच महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शासकीय जागेवरील वृक्षतोड तसेच खासगी जागेतील झाडे तोडण्यासाठी आवश्यक परवानग्या व संमती घेण्यात आली आहे का, याची चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते आणि चौकशीनंतर काय कारवाई केली जाते, याकडे सायगाव विभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!