आनेवाडी परिसरात बिबट्या मादीचा दोन बछड्यांसह मुक्त वावर; ग्रामस्थांमध्ये घबराट
शेळ्यांवरील हल्ल्यानंतर बिबट्याचा गावालगत वावर वाढला; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
आनेवाडी, ता. ८ : आनेवाडी-सायगाव विभागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, आनेवाडी-विरमाडे शिवेजवळ बिबट्या मादी दोन बछड्यांसह आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी मोरेवाडी व दरेखुर्द परिसरात घराच्या दारात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर महामुलकरवाडी, रायगाव, मालुसरेवाडी, पवारवाडी, मोरघर आणि जावळेवाडी परिसरातही बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
आता आनेवाडी-विरमाडे शिवेजवळ बिबट्या मादी दोन बछड्यांसह फिरताना दिसून आल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. बिबट्या आपल्या बछड्यांसह परिसरात फिरत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मेरूलिंग डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, या भागात विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. पाणी व खाद्याची उपलब्धता कमी होत असल्याने वन्यप्राणी गावालगतच्या वाडी-वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढू नये, यासाठी वनविभागाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“बिबट्या मादी दोन बछड्यांसह गावाच्या परिसरात दिसून आल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर एकटे पडणे टाळावे. लहान मुले तसेच जनावरांची विशेष काळजी घ्यावी. वनविभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन माजी सरपंच बबन फरांदे यांनी केले.
