लोहगाव पोलिसांची कामगिरी! चोरीला गेलेले १ लाख ८० हजारांचे ६ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत
पुणे : मोबाईल चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना लोहेगाव पोलिसांनी दिलासा दिला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी चोरीला गेलेले एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत.
लोहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
लोहेगाव पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन शोधून काढले. त्यानंतर संबंधित मोबाईलची पडताळणी करून ते तक्रारदारांना परत करण्यात आले. आपले गहाळ झालेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अभिलाषकुमार आणि लोणीकंद विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत लोहेगाव पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
दरम्यान, नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्यास त्यांनी सीईआयआर (CEIR) पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन लोहेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाईल हरवल्यानंतर तातडीने तक्रार नोंदवून आवश्यक माहिती पोलिसांना दिल्यास मोबाईल शोधण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते.
