काशीळमधील अपघातग्रस्त युवकासाठी सरकार कॅम्पसचे सदस्य ठरले देवदूत; प्रसंगावधान राखत वाचवले प्राण!
शुभम घाडगे व सहकाऱ्यांची मध्यरात्री तत्परता; जखमी ओंकार पवार यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल
काशीळ सातारा : पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या युवकासाठी सरकार कॅम्पसच्या सदस्यांनी देवदूत बनून धाव घेतली. प्रसंगावधान राखत जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे काम त्यांनी केले. शुभम घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त ओंकार पवार यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आटीत येथील ओंकार पवार हे पहाटे दोनच्या सुमारास काशीळ परिसरातून प्रवास करत असताना त्यांचा गंभीर अपघात झाला. या अपघातात ते जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. याचवेळी योगायोगाने सरकार कॅम्पसचे सदस्य शुभम घाडगे आणि त्यांचे सहकारी त्या मार्गावरून प्रवास करत होते. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला युवक निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
शुभम घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम जखमी ओंकार पवार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास मदत केली. तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले आणि तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून घेतली. त्यानंतर ओंकार यांना रुग्णवाहिकेतून सातारा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मध्यरात्रीच्या वेळी अनोळखी जखमी युवकाच्या मदतीसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता धावून जाण्याची त्यांची भूमिका सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे. शुभम घाडगे हे केवळ या प्रसंगापुरतेच नव्हे, तर कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सरकार कॅम्पस या संस्थेच्या माध्यमातून ते गरीब आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आवश्यक ती मदत करतात. गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करणे, वृक्षारोपण करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांतून ते सातत्याने समाजासाठी योगदान देत आहेत.
संकटाच्या काळात माणुसकी जपणाऱ्या शुभम घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या तत्परतेमुळे माणुसकीचा एक आदर्श समाजासमोर निर्माण झाला आहे.
