पुणे

भरधाव पीएमटी बसची दुचाकीस्वाराला जोरदार धडक; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे : वानवडी परिसरात भरधाव पीएमटी बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील हिंदुस्तान चर्च सिग्नल चौकात घडली.
     याप्रकरणी वानवडी वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमटी बसचालक रामेश्वर पुंडलिक निकम (वय ५०, रा. गावडे वस्ती, भोसरी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात बस चालवली. यावेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला.
      मृत दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटलेली नसून, या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!