पुणे

पोलिसांच्या नावाने डिजिटल अटकेची धमकी; ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ५ लाखांचा गंडा

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून डिजिटल अटकेच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील डीपी रोड, औंध परिसरात राहणाऱ्या ६६ वर्षीय नागरिकाला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले. याप्रकरणी संबंधित नागरिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी अज्ञात मोबाइलधारकाने तक्रारदाराशी संपर्क साधला. आपण एटीएस मुंबई येथील पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली चौकशी आणि तपास सुरू असल्याचे भासवण्यात आले.

     या प्रकरणाची माहिती कोणालाही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन तक्रारदाराला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून आरोपींनी ५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
      या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१९(२), ३१८(४), २०४, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शीतल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!