पुणे

लोणीकाळभोरमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; कारखाना चालविणाऱ्या २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लोणीकाळभोर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची बेकायदा निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तयार सुगंधित तंबाखू, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणीकाळभोर परिसरातील या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २ चे अधिकारी व कर्मचारी पूर्व प्रादेशिक विभागात गस्त घालत होते. त्यावेळी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इन्व्होरा इंग्लिश स्कूलजवळील सोमेश्वरनगर, गायकवाड वस्ती आणि कदम वाकवस्ती परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार परेश सावंत आणि सचिन कांबळे यांना मिळाली.

     या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६, रा. काळूबाई मंदिराजवळ, वृंदावन कार्यालय रोड, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हा तरुण प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करताना आढळून आला.

    छाप्यादरम्यान पोलिसांनी तयार सुगंधित तंबाखू, उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, पॅकिंगचे साहित्य, पॅकिंग मशीन तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित ठिकाणी बेकायदा उत्पादन सुरू असल्याचेही तपासात समोर आले.

      महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित व स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री यावर प्रतिबंध आहे. असे असतानाही प्रतिबंधित पदार्थांची निर्मिती व विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी आरोपी रोहित गुप्ता याच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ नुसार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, सहायक फौजदार ज्योतिबा कुरुळे तसेच पोलीस अंमलदार परेश सावंत, महेश बारवकर, प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

error: Content is protected !!