पुणे

ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने दाम्पत्याला ७.२५ लाखांचा गंडा; मोबाईलचा ऍक्सेस मिळवून खात्यातून पैसे लंपास

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:


अनोळखी व्यक्तीकडून पाठवलेल्या  ॲप्लिकेशनद्वारे मोबाईलचा ताबा मिळवून फसवणूक; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हडपसर : ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या ॲप्लिकेशन आणि लिंकपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हडपसर परिसरातील राजगड सोसायटी, केशर चौक येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीची तब्बल ७ लाख २५ हजार ७६१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. २१ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे कोणत्याही प्रकारचे गुगल पे किंवा फोन पे खाते नसतानाही अज्ञात व्यक्तीने आरटीओ चलन भरण्यासाठी पाठविलेल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवला. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीच्या संयुक्त बँक खात्यातून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण ७ लाख २५ हजार ७६१ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

     या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
     या घटनेमुळे आरटीओ चलन, दंड भरणे किंवा अन्य सरकारी कामांच्या नावाखाली पाठविल्या जाणाऱ्या अनोळखी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीचा धोका पुन्हा समोर आला आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीने पाठविलेली APK फाइल किंवा ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये, तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!