क्रेडिट कार्ड प्रोटेक्शनच्या नावाखाली ३ लाख ९३ हजारांची ऑनलाइन फसवणूक
५५ वर्षीय महिलेची दिशाभूल; ओटीपी मिळवून बँक खात्यातील रक्कम लंपास
पुणे: क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्याच्या नावाखाली एका ५५ वर्षीय महिलेची तब्बल ३ लाख ९३ हजार ३५७ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ही घटना घडली. अज्ञात मोबाइलधारकाने तक्रारदार महिलेशी संपर्क साधून क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन अॅक्टिव्हेशनची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ओटीपी मिळवून घेतला. या प्रक्रियेचा गैरफायदा घेत संबंधित व्यक्तीने महिलेच्या बँक खात्यातून ३ लाख ९३ हजार ३५७ रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद साळगावकर करीत आहेत.
